शिक्षण सभापती ॲड. प्रीती हर्षल रेवणे यांच्या पुढाकारातून गुरु पौर्णिमेनिमित्त महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या मनमोहक नृत्याविष्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद

गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून शिक्षण समिती, महानगरपालिका अमरावती व नुपूर डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणाचा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

सायंकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच लोकसहभागातून महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलाविकासाला चालना मिळावी, या उदात्त उद्देशाने शिक्षण सभापती ॲड. प्रीती हर्षल रेवणे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शास्त्रीय नृत्य विशारद श्री. प्रकाश मेश्राम यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना नृत्यकलेचे प्रशिक्षण मिळाले.

विद्यार्थ्यांनी कोरिओग्राफर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट, आकर्षक आणि शिस्तबद्ध नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सादरीकरणातील समन्वय आणि कलात्मकता यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमास शिक्षण समितीच्या उपसभापती वंदनाताई मडघे, शिक्षण समिती सदस्या सुनिताताई भेले, डॉ प्रकाश मेश्राम शिक्षणाधिकारी महानगरपालिका अमरावती, योगेश राणे ,प्रशांत नालसे, चित्रा खोब्रागडे, मुख्याध्यापक तसेच महानगरपालिका शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक आणि नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमात मनपा मराठी शाळा क्रमांक १३, चपराशीपुरा तसेच मनपा मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जेवड येथील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व पारंपरिक नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृती, गुरु-शिष्य परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रभावी दर्शन घडले.

या उपक्रमामुळे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करण्याची संधी मिळाली असून भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा आमचा निर्धार आहे छंद शिबिराची जनसमुदायाच्या सहभागातुन ही सुरुवात आहे यासाठी श्री प्रकाश मेश्राम संगीत विशारद हे आपल्या सोबत काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला याकरिता त्यांचे धन्यवाद.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड प्रीती हर्षल रेवणे शिक्षण सभापती महानगरपालिका अमरावती यांनी केली सदर कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून नाना देशमुख हे होते प्रास्ताविक डॉ शितल तायडे यांनी केले श्री विकी शर्मा डॉ सलीम भाई घाणीवाले डॉ निखिलेश नलोडे प्रीती साहू राजीव बोरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ मंजू अडवाणी यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top