शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी (दि. ३१ जुलै) सकाळी अकोली अंडरपास येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्याची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी पाणी उपसण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याबरोबरच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
अकोली अंडरपास हा शहरातील महत्त्वाचा मार्ग असल्याने पावसाळ्यात येथे पाणी साचल्यास वाहतुकीवर परिणाम होतो आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी पाण्याचा निचरा, पंपिंग यंत्रणेची कार्यक्षमता, जलनिस्सारण व्यवस्था आणि अंडरपास परिसरातील साफसफाईची सविस्तर माहिती घेतली. तसेच संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.
यानंतर आयुक्तांनी साई नगर परिसराला भेट देत तेथील स्वच्छता व्यवस्था, नाल्यांची स्थिती आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला.
परिसरातील मुख्य व उपनाल्यांची पाहणी करताना गाळ, कचरा आणि अडथळे तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील यासाठी नियमित साफसफाई करण्याबरोबरच पावसाळ्याच्या काळात विशेष पथके कार्यरत ठेवण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आयुक्तांनी स्वच्छता विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याचे सांगितले. साचलेले पाणी, कचरा आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे स्वच्छता मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविणे, नियमित फॉगिंग, निर्जंतुकीकरण तसेच नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या..
नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या नागरी सुविधांबाबत महानगरपालिका प्रशासन सतर्क असून पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.
शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून काम करण्यावर त्यांनी भर दिला.
पाहणीदरम्यान लोकप्रतिनिधींनीही परिसरातील विविध समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येतील, अशी ग्वाही महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
अकोली अंडरपास हा रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारितील महत्त्वाचा भाग असल्याने या ठिकाणी वारंवार निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन महानगरपालिकेसोबत समन्वय साधत कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
सदर प्रकरणाची दखल रेल्वे प्रशासनाने घ्यावी, असे महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले यांनी सांगीतले.
या पाहणी दौऱ्यात उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेते चेतन गावंडे, नगरसेविका लता देशमुख, मंजुषा जाधव, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, धनंजय शिंदे, अविनाश रघटाटे, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, उपअभियंता श्रीरंग तायडे, हेमंत महाजन तसेच विविध विभागाचे संबंधीत अधिकारी व मनपा कर्मचारी उपस्थित होते.

