अकोली अंडरपाससह साई नगर परिसरातील पाणी साचणे, स्वच्छता व नाल्यांच्या प्रश्नांवर महानगरपालिकेत आढावा बैठक

अमरावती शहरात सुरू असलेल्या पावसामुळे अकोली अंडरपास येथे वारंवार पाणी साचण्याची समस्या, साई नगर परिसरातील स्वच्छतेची अपुरी व्यवस्था, नाल्यांची साफसफाई, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी या विविध विषयांवर आज (शुक्रवार, दि. ३१ जुलै) अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीच्या सुरुवातीला अकोली अंडरपास परिसरात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो तसेच अपघातांचा धोका निर्माण होतो.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना, ड्रेनेज यंत्रणेची क्षमता वाढविणे, नियमित पंपिंग व्यवस्था कार्यान्वित ठेवणे तसेच संबंधित विभागांमध्ये समन्वय राखून कामे जलदगतीने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता अधोरेखित करत पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर, अंडरपास परिसरात तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांवर विशेष लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत साई नगर परिसरातील स्वच्छता व्यवस्था, नाल्यांची साफसफाई, साचलेला गाळ, कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था, पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा प्रतिबंध आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरही सविस्तर चर्चा झाली.

नाल्यांमधील अडथळे तातडीने दूर करून पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच स्वच्छता विभागाने दररोजच्या कामांचा आढावा घेऊन आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध ठेवावी, अशा सूचनाही बैठकीत करण्यात आल्या.

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी शहरातील स्वच्छता, जलनिस्सारण आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देत समस्या वेळेत सोडविण्यावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली.

अकोली अंडरपास तसेच शहरातील इतर संवेदनशील ठिकाणी पाणी साचू नये यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देतानाच स्वच्छता व नाला सफाईची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत विभागीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीच्या शेवटी अकोली अंडरपास परिसरातील पाणी साचण्याची समस्या, साई नगरमधील स्वच्छता, नाल्यांची साफसफाई आणि पावसाळ्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून तातडीने कामे पूर्ण करावीत, तसेच प्रत्येक कामाचा नियमित आढावा घेऊन नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते नाना आमले, झोन सभापती स्वाती कुलकर्णी, शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर, जयंत डेहणकर, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. लता देशमुख, नगरसेवक मिलिंद बांबल, आशिष अतकरे, नगरसेविका मंजुषा जाधव, लविणा हर्षे, माजी गटनेते चेतन पवार, चंद्रशेखर कुलकर्णी, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, नगरसचिव संदीप वडुरकर, उपअभियंते श्रीरंग तायडे व हेमंत महाजन, रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच महानगरपालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top