अमरावती शहरातील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार, दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढत्या वाहनांची संख्या, प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, चौकांमधील नियोजन, रस्त्यांच्या वापराचे व्यवस्थापन, पार्किंगची समस्या, पादचारी सुरक्षेसह शहरातील वाहतूक शिस्तीच्या विविध मुद्द्यांवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था नागरिकाभिमुख करण्यावर भर देत संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक कोंडी निर्माण होणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा सुरळीत प्रवाह राहण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी महानगरपालिका, वाहतूक पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.
बैठकीदरम्यान रस्त्यांवरील अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बाबी तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, योग्य नियोजन आणि नियमित देखरेख यांची आवश्यकता आहे.
अमरावती शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची वाढती वाहतूक गरज लक्षात घेऊन भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा आराखडा तयार करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि त्रासमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, ट्राफीक सहाय्यक आयुक्त खताळे साहेब, पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब, वाहतूक पोलीस निरीक्षक ब्राम्हणे मॅडम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तुषार काळे, शहर अभियंता श्रीधर कांबळे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, सहाय्यक आयुक्त मंगेश कडु, अविनाश रघटाटे, मालमत्ता अधिकारी सचिन मांडवे, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, उपअभियंता हेमंत महाजन, वाहतूक विभागाचे प्रतिनिधी, आरटीओ विभागाचे प्रतिनिधी, चेंबरचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; वाहतूक कोंडी, पार्किंग व नियोजनावर चर्चा
