अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी (दि. ३ ऑगस्ट, २०२६) महानगरपालिकेच्या उत्तर झोन क्र. १ अंतर्गत रामपुरी कॅम्प परिसरातील विविध भागांची पाहणी करून नागरी स्वच्छता, पावसाळी पूर्वतयारी, नाल्यांची साफसफाई, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी, कचरा व्यवस्थापन तसेच सार्वजनिक सुविधांच्या कामांचा आढावा घेतला.
आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सर्वप्रथम शेगाव-रहाटगाव परिसराची पाहणी केली. या भागातील मुख्य रस्ते, अंतर्गत मार्ग, नाल्यांची स्थिती तसेच स्वच्छतेची कामे तपासून संबंधित अधिकाऱ्यांना नियमित साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्याच्या काळात नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टिक व इतर कचरा साचल्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी नाल्यांची तातडीने आणि नियमित साफसफाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर आयुक्तांनी आशियाड कॉलनी व सन्मती कॉलनी परिसराची पाहणी केली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित स्वच्छता, रस्त्यांची स्थिती, कचरा संकलन व्यवस्था तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता याची तपासणी करण्यात आली.
परिसरात नियमित कचरा उचलला जावा, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिग निर्माण होऊ नयेत तसेच स्वच्छता कर्मचारी वेळेवर उपस्थित राहून जबाबदारीने काम करतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शेगाव येथील महानगरपालिका सेमी इंग्लिश शाळेलाही आयुक्तांनी भेट दिली. शाळेच्या परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची स्थिती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध मूलभूत सुविधा तसेच परिसरातील सुरक्षिततेची पाहणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असून, शाळा परिसरात कोणतीही गैरसोय राहू नये, यासाठी आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
रहाटगाव रिंग रोड परिसरात पाहणी करताना रस्त्यालगतची स्वच्छता, पावसाळ्यातील पाण्याचा निचरा, अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची स्थिती तपासण्यात आली.
रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वीजवाहिन्यांच्या संपर्कात येण्याची शक्यता असलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्या तातडीने छाटण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
आराधना कॉलनी चौकातील कचरा संकलन स्थळाची पाहणी करताना तेथील स्वच्छता व्यवस्था, कचरा उचलण्याची वारंवारिता तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा आढावा घेण्यात आला.
कचऱ्याचे ढिगारे तयार होणार नाहीत, दुर्गंधी पसरू नये आणि परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कचरा संकलन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
यानंतर पोटे कॉलेज रोडवरील नाल्याची पाहणी करून नाल्यातील गाळ, अडथळे आणि पाण्याच्या प्रवाहाची स्थिती तपासण्यात आली.
पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यासाठी नाल्यांमधील अडथळे त्वरित दूर करावेत, आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत तसेच भविष्यात पाणी साचण्याच्या घटना
टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
पदम सौरभ कॉलनीमध्ये स्वच्छता, अंतर्गत रस्ते, नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची पाहणी करून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या.
नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देत त्यांचे तातडीने निराकरण करावे, तसेच संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून सेवा अधिक प्रभावी कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
रहाटगाव स्मशानभूमी परिसराचीही आयुक्तांनी पाहणी केली.
स्मशानभूमीतील स्वच्छता, अंतर्गत रस्ते, प्रकाश व्यवस्था, झाडांची देखभाल तसेच इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.
या परिसरात येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.


