अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आज, बुधवार (दि. ५ ऑगस्ट २०२६) रोजी स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाचा आढावा घेत विभागाच्या दैनंदिन कामकाजाची, प्रलंबित प्रकरणांची तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती जाणून घेतली.
यावेळी जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर देत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
बैठकीदरम्यान महापौरांनी जन्म व मृत्यू नोंदणीची प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रत्येक अर्जाची पडताळणी करून संबंधित जन्म किंवा मृत्यू नोंदणी सात दिवसांच्या आत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
तसेच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रमाणपत्रांचे तातडीने वितरण करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
महापौर श्रीचंद तेजवानी म्हणाले की, जन्म आणि मृत्यू नोंदणी ही नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सेवा आहे.
शासकीय योजना, शैक्षणिक प्रवेश, वारसाहक्क, बँकिंग, विमा तसेच इतर अनेक प्रशासकीय कामांसाठी जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांची आवश्यकता असते.
त्यामुळे या प्रक्रियेत होणारा कोणताही विलंब नागरिकांसाठी अडचणीचा ठरू शकतो. म्हणून संबंधित विभागाने प्रत्येक अर्जाकडे गांभीर्याने पाहून वेळेत नोंदणी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे.
यावेळी त्यांनी विभागातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेत त्यांची संख्या कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.
कोणतेही प्रकरण विनाकारण प्रलंबित ठेवू नये, अर्जांमध्ये त्रुटी असल्यास संबंधित नागरिकांना त्वरित माहिती देऊन त्या दूर करण्यासाठी सहकार्य करावे आणि सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
महापौरांनी विभागातील अभिलेख व्यवस्थापन, डिजिटल नोंदणी, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच प्रमाणपत्र वितरण प्रणालीबाबतही माहिती घेतली.
नागरिकांना अधिकाधिक ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सेवा वितरणात कोणतीही दिरंगाई होऊ नये तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
याशिवाय, विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, कामकाजात पारदर्शकता राखावी आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे आवाहनही महापौरांनी केले.
बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जन्म-मृत्यू नोंदणीची सद्यस्थिती, प्रलंबित अर्ज, प्रमाणपत्र वितरण, ऑनलाइन सेवा तसेच भविष्यातील कार्ययोजनाबाबत माहिती सादर केली.
त्यावर महापौरांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करून नागरिकांना जलद, सुलभ व प्रभावी सेवा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत सभागृह नेता चेतन गावंडे, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, राजु कुरील, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा आत्राम, जन्म-मृत्यु विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
