अमरावती महानगरपालिकेचा १५ ऑगस्ट स्थापना दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार : महापौर श्रीचंद तेजवानी

अमरावती महानगरपालिकेचा १५ ऑगस्ट रोजी होणारा स्थापना दिन यंदा सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि सांस्कृतिक वैभवाचा संगम ठरणाऱ्या विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली.

बैठकीत स्थापना दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता “जनतेचा उत्सव – शहराच्या विकासाचा संकल्प” या संकल्पनेतून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळावा यासाठी सामाजिक, सांस्कृतिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला शहरभर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले.

१५ ऑगस्ट रोजी स्थापना दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व माजी महापौरांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.

याशिवाय संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्यदिन आणि महानगरपालिका स्थापना दिन या दुहेरी पर्वाचे औचित्य साधणारा हा सोहळा नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

कार्यक्रमांतर्गत देशभक्ती गीत गायन स्पर्धा, “वर्धापन दिन व १५ ऑगस्ट” या विषयावरील रांगोळी स्पर्धा, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित नृत्य, अभंग, गवळण, भारुड अशा विविध लोककलांचा २५ पेक्षा अधिक कलाकारांच्या सहभागातून रंगणारा मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

स्थापना दिनानिमित्त अमरावती महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या ऐतिहासिक प्रवासाचे दर्शन घडविणारी दुर्मीळ छायाचित्रांची विशेष प्रदर्शनीही तयार करावी.

तसेच सफाई कर्मचारी, इतर मनपा कर्मचारी आणि नागरिकांसाठी रक्तातील विविध तपासण्या, सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबीर, नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे.

स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार असून आवश्यक पूर्वतयारी आणि नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

यावेळी शहरातील सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, युवक मंडळे तसेच सर्व नागरिकांनी स्थापना दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावेत, असे आवाहन महापौर श्रीचंद तेजवानी यांनी केले.

या बैठकीत उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते नाना आमले, नगरसेवक रतन डेंडुले, डॉ. प्रशांत देशपांडे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top