अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्य १४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य रक्तदान शिबीर, रक्त तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही बैठक अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली.
बैठकीत शिबिराच्या नियोजनासंदर्भात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. रक्तदान शिबिरासाठी आवश्यक सुविधा, रक्तपेढ्यांशी समन्वय, रक्तदात्यांची नोंदणी, वैद्यकीय पथकांची नियुक्ती, रक्तसंकलनासाठी आवश्यक साहित्य, नागरिकांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था, विविध आजारांच्या प्राथमिक तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, औषध वितरण तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
महापौर श्रीचंद तेजवानी यांनी संबंधित विभागप्रमुख, आरोग्य अधिकारी व आयोजन समितीच्या सदस्यांना शिबिराचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या.
प्रत्येक नागरिकाला कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच शिबिरस्थळी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रतीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वयंसेवकांची नियुक्ती आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी महापौरांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अपघातग्रस्त, गंभीर आजारांवर उपचार घेणारे रुग्ण, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण तसेच थॅलेसेमिया व इतर रक्तविकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी रक्ताची सातत्याने आवश्यकता असते.
त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होईल. नियमित आरोग्य तपासणीमुळे अनेक गंभीर आजारांचे प्रारंभीच्या टप्प्यात निदान होऊन वेळेत उपचार शक्य होतात.
त्यामुळे या शिबिराचा लाभ शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती तसेच विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीदरम्यान जनजागृतीसाठी व्यापक प्रचार मोहीम राबविणे, सामाजिक माध्यमे, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना आणि विविध मंडळांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत शिबिराची माहिती पोहोचविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
शहरातील विविध भागांत जनजागृती करून रक्तदानासाठी जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नोंदविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले.
सर्वांनी समन्वयाने काम करून १४ ऑगस्ट रोजी होणारे रक्तदान, रक्त तपासणी व आरोग्य शिबिर यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी विशेषतः महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
सफाई कर्मचारी हे शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, तसेच आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या सहभागामुळे समाजात रक्तदान आणि नियमित आरोग्य तपासणीबाबत सकारात्मक संदेश जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीत उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, गटनेता नाना आमले, डॉ.राजेंद्र तायडे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज खान, स्वास्थ अधिक्षक विजय बुरे, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक, सफाई कर्मचारी, बिटप्यून, सुपरवायजर, कंत्राटदार, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

