महापौर श्रीचंद तेजवानी यांनी बिटप्यून कर्मचाऱ्यांची घेतली आढावा बैठक; नियोजनबद्ध व यशस्वी आयोजनासाठी दिल्या सूचना

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य रक्तदान शिबीर, रक्त तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराच्या तयारीला वेग आला आहे.

या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या अनुषंगाने आज शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महानगरपालिकेच्या बिटप्यून कर्मचाऱ्यांची विशेष आढावा बैठकस्‍व.सुदामकाका देशमुख सभागृहात घेऊन कार्यक्रमाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीची जाणीव ठेवून समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीर, विविध आजारांच्या तपासण्या तसेच सर्वसमावेशक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा लाभ शहरातील सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि गरजू घटकांना होणार असल्याने कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात येत आहे.

रक्तदात्यांची नोंदणी, नागरिकांना मार्गदर्शन, विविध तपासणी विभागांची उभारणी, शिस्तबद्ध गर्दी व्यवस्थापन, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची सुविधा, वैद्यकीय पथकांना आवश्यक सहकार्य, साहित्याची उपलब्धता तसेच कार्यक्रमस्थळी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी सांगितले की, रक्तदान हा सर्वोच्च सामाजिक उपक्रम असून एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून विविध आजारांचे लवकर निदान होऊन नागरिकांना योग्य उपचार मिळण्यास मदत होणार असल्याने या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बिटप्यून कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना महापौरांनी प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशामध्ये केवळ अधिकारी नव्हे तर प्रत्येक कर्मचारी हा महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना सुसंवादाने मार्गदर्शन करणे, वेळेचे काटेकोर पालन करणे, समन्वय राखणे आणि सेवाभावाने काम करणे, या बाबींवर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीदरम्यान कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा झाली. शिबिरादिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येत असून आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे हे भव्य रक्तदान शिबीर, रक्त तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबीर शहरातील नागरिकांसाठी आरोग्यदायी आणि समाजोपयोगी ठरणार असून, या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेशही दिला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महानगरपालिका प्रशासन, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचे सहकार्य घेतले जात असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन महापौर श्रीचंद तेजवानी यांनी केले.

या बैठकीत उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, नगरसेवक संजय तिरथकर, डॉ.प्रशांत देशपांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, स्‍वास्‍थ अधिक्षक विजय बुरे, प्रल्‍हाद चव्‍हाण, बिटप्‍यून उ‍पस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top