अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी शहरातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देत आरोग्य सेवा, स्वच्छता, बांधकाम तसेच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
शहरातील विविध विकासकामे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासण्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी मोदी हॉस्पिटल, बडनेरा येथील आठवडी बाजार तसेच चमननगर परिसराला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
मोदी हॉस्पिटलची पाहणी; औषधसाठा व मनुष्यबळाचा घेतला आढावा
आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सर्वप्रथम मोदी हॉस्पिटल येथे भेट देऊन रुग्णालयाच्या विविध विभागांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी दवाखान्यातील कार्यपद्धती, रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची स्थिती, उपलब्ध औषधसाठा तसेच आवश्यक असलेल्या औषधांची माहिती जाणून घेतली. तसेच दवाखान्यात उपलब्ध असलेल्या कर्मचारी वर्गाची माहिती घेऊन सध्याच्या कामकाजाच्या तुलनेत आणखी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे, याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांना वेळेत आणि आवश्यक त्या सुविधा मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगून उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचा योग्य वापर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा, आरोग्य सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना समाधानकारक सेवा मिळावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.
बडनेरा आठवडी बाजाराची पाहणी; बांधकामाचा मलबा तातडीने हटविण्याचे निर्देश
यानंतर आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी बडनेरा येथील आठवडी बाजार परिसराची पाहणी केली. या ठिकाणी जुन्या शौचालयाच्या जागेवर सुरू असलेल्या नवीन बांधकामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.
दरम्यान, जुन्या इमारतीचे बांधकाम पाडल्यानंतर त्याचा मलबा परिसरात पडून असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच बाजारात येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित राहावा, यासाठी हा बांधकाम मलबा तातडीने उचलून घेण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नवीन बांधकामाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता आणि कामाची गुणवत्ता याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी यावेळी केल्या. परिसरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी नवी वस्ती प्रभागाचे नगरसेवक उपस्थित होते.
चमननगरमधील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यावर भर आयुक्तांनी त्यानंतर अकोली वळण रस्ता चमननगर परिसराची पाहणी केली. अकोली वळण रस्ता चमननगर परिसरातून जात असल्याने या भागातील नागरिकांच्या सुविधा आणि नागरी समस्यांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.
महानगरपालिकेच्या वतीने चमननगर येथील नागरिकांना देण्यात आलेल्या भूखंडांची आयुक्तांनी पाहणी केली. सदर ठिकाणी नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांची उपलब्धता कितपत आहे, याची माहिती त्यांनी घेतली.
या भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
नागरिकांना भूखंड उपलब्ध करून दिल्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे असल्याने त्यानुसार नियोजन करून कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
रस्त्याची आवश्यकता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील इतर नागरी सुविधांचा आढावा घेऊन संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही आयुक्तांनी निर्देशित केले. यावेळी जुनी वस्ती प्रभागाचे नगरसेवक उपस्थित होते.
आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामे आणि नागरी सुविधांची पाहणी केल्याने संबंधित विभागांच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयीन अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी करून समस्या समजून घेण्यावर आयुक्तांनी भर दिला.
आरोग्य सुविधा, स्वच्छता, बांधकाम, रस्ते आणि पिण्याचे पाणी या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करणे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
आयुक्तांच्या या पाहणी दौऱ्यात शहरातील विविध भागांतील प्रत्यक्ष समस्या समोर आल्याने त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आरोग्य, स्वच्छता, रस्ते व पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्यास मदत होणार आहे.
आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान झोन सभापती किशोर जाधव, नगरसेवक अजय जयस्वाल, नजीबखान करीम खान, संदिप कांबळे, नगरसेविका रजनी डोंगरे, गौरी मेघवाणी, नुजहत परवीन शाकीर हुसैन, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता श्रीधर कांबळे, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, उपअभियंता शरद तिनखेडे, हेमंत महाजन, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाणे, अमरावती शहर समन्वयक श्र्वेता बोके यांच्यासह स्वास्थ्य निरीक्षक आणि महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.


