१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच अमरावती महानगरपालिका स्थापना दिनानिमित्त अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत अमरावती रक्तदान समितीच्या कार्यकारिणीसोबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये रक्तदान शिबिराच्या नियोजनासह विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन, रक्तदात्यांचा सहभाग तसेच विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली. स्वातंत्र्य दिन आणि महानगरपालिका स्थापना दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी केले आहे.
रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.
या आढावा बैठकीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, मध्य झोन क्र. २ चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटबागे, अमरावती रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा, उपाध्यक्ष अजय दातेराव, श्याम शर्मा, सदस्य रितेश व्यास, निखील तेरेदेसाई, सचिन काकडे तसेच डॉ. पंजाबराव देशमुख स. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
