अमरावतीत ‘हर घर तिरंगा’अंतर्गत भव्य तिरंगा रॅली; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

देशभक्तीची भावना जनमानसात जागृत करण्यासह राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल आदर, अभिमान आणि आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत बुधवारी (दि. १२ ऑगस्ट) भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

दुपारी ४ वाजता नेहरू मैदान येथून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.

रॅलीने राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इर्विन चौक मार्गे शहरातून मार्गक्रमण करत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे समारोप केला.

रॅलीदरम्यान जयस्तंभ चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच इर्विन चौक येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

रॅलीमध्ये हजारो अमरावतीकरांसह महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी, विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

तिरंगा हातात घेऊन देशभक्तीच्या घोषणांनी भारावलेल्या वातावरणात निघालेल्या या रॅलीने शहरात राष्ट्रप्रेमाचा उत्साह निर्माण केला. यावेळी उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा तसेच अवयवदानाची शपथ घेतली.

विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. रॅलीच्या समारोपावेळी रंगीबेरंगी तिरंगा फुगे आकाशात सोडण्यात आले.

‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत १२ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, तिरंगा रॅली हा त्यातील महत्त्वाचा उपक्रम ठरला.

राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर, अभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात रॅली यशस्वी ठरली.

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी अमरावतीकरांना ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर, अभिमान आणि देशप्रेमाची भावना व्यक्त करावी, असे त्यांनी सांगितले. “तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा राष्ट्रध्वज नाही, तर तो आपल्या स्वातंत्र्याचा, राष्ट्रीय एकात्मतेचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे.

‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून प्रत्येक अमरावतीकराने आपल्या घरात आणि मनात देशभक्तीची भावना जागृत करावी. नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह, शेजाऱ्यांसह आणि मित्रपरिवारासह या अभियानात सहभागी होऊन अमरावती शहराला तिरंग्याच्या रंगांनी आणि देशप्रेमाच्या भावनेने उजळून टाकावे,” असे आवाहन महापौर श्रीचंद तेजवानी यांनी केले.

तसेच १५ ऑगस्टपर्यंत घर, कार्यालये, दुकाने आणि संस्थांवर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवावा आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचे नियम पाळावेत, असेही त्यांनी नागरिकांना आवर्जून सांगितले.

“आपली एकजूट आणि देशप्रेमाची भावना या अभियानातून दिसून यावी. प्रत्येक घरावर तिरंगा आणि प्रत्येक हृदयात भारताचा अभिमान हीच ‘हर घर तिरंगा’ची खरी भावना आहे,” असे महापौरांनी नमूद केले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी उपस्थितांना संबोधित करताना ‘हर घर तिरंगा’ ही केवळ मोहीम नसून राष्ट्रध्वजाशी असलेले प्रेम, निष्ठा आणि अभिमान व्यक्त करण्याची संधी असल्याचे सांगितले.

“आजची रॅली केवळ मिरवणूक नसून देशप्रेमाची अभिव्यक्ती, एकतेचा संदेश आणि राष्ट्रभक्तीचा सजीव उत्सव आहे,” असे त्यांनी नमूद केले. १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक अमरावतीकराने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, तसेच कुटुंब आणि समाजात देशप्रेमाची भावना रुजवून ‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. गोंदावले यांनी केले.

तिरंगा हा शूर जवानांचा अभिमान, शेतकऱ्याचा घाम आणि प्रत्येक नागरिकाच्या आशेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी सांगितले.

रॅलीला महापौर श्रीचंद तेजवानी, आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता नाना आमले, गटनेता डॉ.राजेंद्र तायडे, गटनेता शेख हमीद शेख वाहेद, झोन सभापती माधुरी ठाकरे, स्‍वाती कुलकर्णी, इस्‍माईल कासम लालुवाले, किशोर जाधव, खॉ आसिया अंजुम वहिद, विधी समिती सभापती स्‍नेहा लुल्‍ला व उपसभापती डॉ.मधुरा कहाळे, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील व उपसभापती सुमती ढोके, माध्‍यमिक पुर्व माध्‍यमिक व तांत्रिक शाळा समिती सभापती अॅड.प्रिती हर्षल रेवणे व उपसभापती वंदना मडघे, महिला व बाल कल्‍याण समिती सभापती ममता आवारे व उपसभापती लता देशमुख, नगरसेवक, नगरसेविका, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, उपायुक्‍त योगेश पिठे, महापालिका व पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्‍यवरांनी सहभागी सर्व नागरिक, शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.

ही रॅली यशस्वी करण्यासाठी बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, बाजार व परवाना विभाग व अग्निशमन विभाग यांचे विशेष योगदान लाभले. या सर्वांनी रॅलीच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत अपार मेहनत घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top