अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक २, राजापेठ अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन व मनपा शाळा क्रमांक २० यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
देशभक्तीच्या उत्साहात आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात पार पडलेल्या या रॅलीमुळे अमरावती शहरातील वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले होते.
या भव्य तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ दसरा मैदान येथील शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन येथून करण्यात आला. रॅलीमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या वाहनांवर तसेच हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
शहरी आरोग्य केंद्रापासून सुरू झालेली रॅली राजापेठ मार्गे राजकमल चौक आणि त्यानंतर नेहरू मैदान येथे पोहोचली. रॅलीच्या मार्गावर तिरंगा ध्वजांची झालर आणि देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण परिसराचे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.
रॅलीमध्ये सहभागी अधिकारी, कर्मचारी आणि इतर सहभागींच्या वतीने ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.
तिरंगा हातात घेऊन दुचाकींवरून निघालेल्या या रॅलीमुळे अमरावती शहर तिरंगामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान आणि देशभक्तीची भावना नागरिकांमध्ये जागृत करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
या तिरंगा बाईक रॅलीचे नेतृत्व झोन क्रमांक २, राजापेठचे मा. सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांनी केले. तर झोन क्रमांक २ च्या मा. सभापती सौ. स्वाती कुळकर्णी यांनी रॅलीचे अध्यक्षस्थान भूषविले.
मनपा प्रशासनाच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या
शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशनच्या स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी खडसे तसेच मनपा दवाखाना आयसोलेशनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र गुल्हाने यांनी आपल्या सहकाऱ्यांना रॅलीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विशेष पुढाकार घेतला.
आरोग्य विभागातील अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा वर्कर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित ‘हर घर तिरंगा’ अभियानाला आपला पाठिंबा दर्शविला.
मनपा शाळा क्रमांक २० च्या शिक्षक-कर्मचाऱ्यांचा सहभाग या रॅलीमध्ये मनपा शाळा क्रमांक २० मधील शिक्षिका व कर्मचारी यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
शाळेचे मुख्याध्यापक वानखडे सर यांनी रॅलीच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावत उपस्थितांना ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उद्देश आणि राष्ट्रध्वजाचे महत्त्व अधोरेखित केले.
रॅलीमध्ये झोन क्रमांक २ च्या क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण यांच्यासह शहरी आरोग्य केंद्र व मनपा दवाखाना आयसोलेशन येथील अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा वर्कर, इतर कर्मचारी तसेच मनपा शाळा क्रमांक २० मधील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दसरा मैदान येथून सुरू झालेली रॅली राजापेठ, राजकमल चौक मार्गे नेहरू मैदान येथे पोहोचल्यानंतर तेथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मा. सभापती सौ. स्वाती कुळकर्णी, नगरसेवक प्रदीप हिवसे आणि सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी मान्यवरांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रध्वजाचे महत्त्व आणि नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
मनपा शाळा क्रमांक २० चे मुख्याध्यापक वानखडे सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यांनी तिरंगा बाईक रॅलीच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना मनपा अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग आणि शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.
देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या भव्य तिरंगा बाईक रॅलीची सांगता नेहरू मैदान येथे राष्ट्रगीताने करण्यात आली. राष्ट्रगीताच्या वेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी मनपा शाळा क्रमांक २० चे मुख्याध्यापक वानखडे सर यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा वर्कर, शिक्षक तसेच रॅलीच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शब्दसुमनांनी आभार व्यक्त केले.
अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ही तिरंगा बाईक रॅली राष्ट्रभक्ती, एकता आणि उत्साहाचे दर्शन घडविणारी ठरली.
रॅलीच्या माध्यमातून ‘तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक आहे’ हा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.



