अमरावती मनपाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त माजी महापौरांचा सन्मान; मान्यवरांनी मांडला विकासाचा संकल्प

अमरावती महानगरपालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे माजी महापौरांचा सत्कार आणि मुंबईच्या ‘फोक ललकार’च्या २५ कलाकारांचा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित नाट्याविष्कार आयोजित करण्यात आला.

महानगरपालिकेच्या विकासात योगदान देणाऱ्या माजी महापौरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्व. प्रभाकर रामचंद्र सवालाखे यांच्या परिवारासह विद्याताई देशपांडे, प्रवीण काशीकर, विलास इंगोले, मिलिंद चिमटे, अशोक डोंगरे, ॲड. किशोर शेळके, वंदना कंगाले, नंदा चरणजीत कौर विक्रमजीत सिंग, संजय नरवणे आणि चेतन गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी अमरावती मनपाच्या ४३ वर्षांच्या विकासप्रवासाचा आढावा घेतला. स्वच्छ वायु सर्वेक्षणात अमरावतीला २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी काळात स्वच्छ, सुरक्षित, पर्यावरणपूरक, आधुनिक आणि नागरिकाभिमुख शहर घडविण्याचे सामूहिक ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मालमत्ता कराच्या थकीत रकमेवरील शास्तीमध्ये विशेष सवलतीची माहिती दिली. १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान १००%, १ ते १५ सप्टेंबर ७५%, १६ ते ३० सप्टेंबर ५०% आणि १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान २५% सवलत देण्यात येणार आहे.

आमदार सुलभाताई खोडके यांनी माजी महापौरांचा सन्मान हा शहराच्या विकासाच्या इतिहासाचा गौरव असल्याचे सांगत मनपाच्या ६३ शाळांमधील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

आमदार रवी राणा यांनी आजी-माजी आणि भविष्यातील लोकप्रतिनिधींनी अमरावतीच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून अमरावती मनपाला राज्यात अग्रस्थानी नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पाणी, स्वच्छता, रस्ते आणि आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. आमदार संजय खोडके यांनी भूतकाळातील अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय साधण्याची गरज व्यक्त केली.

खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मनपाचे उत्पन्न वाढविणे आणि नागरिकांना मूलभूत सेवा अधिक जलद व सुलभ उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी ‘माझी अमरावती—माझा अभिमान’ या संकल्पनेतून नियोजनबद्ध विकासाचा संकल्प व्यक्त केला. पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमृत-२ अंतर्गत पाणीपुरवठा मजबूत करणे तसेच सुकळी डेपोवरील कचरा समस्येसाठी बायोमायनिंग व घनकचरा व्यवस्थापनाच्या उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या समारोपात ‘फोक ललकार’च्या २५ कलाकारांनी नाटक, संगीत आणि लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top