जोग–स्टेडियम प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले मैदानात

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत दस्तूरनगर येथील प्रभाग क्रमांक ८, जोग–स्टेडियम प्रभागाला भेट देत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.

प्रभागाच्या सन्माननीय नगरसेविका डॉ. अर्चना आत्राम यांच्यासमवेत झालेल्या या पाहणी दौऱ्यात प्रभागातील स्वच्छता, बांधकाम, कचरा संकलन, उद्यान परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी प्रभागातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित सुविधांची पाहणी केली. यामध्ये शुक्रवार बाजार परिसर, ऑक्सिजन पार्क परिसर तसेच कचरा कलेक्शन कॉम्पॅक्टर स्पॉट यांचा विशेष समावेश होता.

बाजार परिसरातील स्वच्छता व्यवस्था, कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि परिसरातील आवश्यक बांधकाम कामांची स्थिती याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने कचरा संकलनाची प्रक्रिया नियमित व शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

कचरा कलेक्शन कॉम्पॅक्टर स्पॉटची पाहणी करताना परिसरात कचरा साचणार नाही, नागरिकांना दुर्गंधी किंवा अस्वच्छतेचा त्रास होणार नाही आणि कचऱ्याची वेळेत उचल होईल, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शुक्रवार बाजार परिसराची पाहणी करताना बाजारामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, परिसराची नियमित साफसफाई आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबतही आवश्यक सूचना करण्यात आल्या.

नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

आयुक्तांनी ऑक्सिजन पार्क परिसराची पाहणी करून उद्यानाची स्वच्छता, देखभाल आणि परिसरातील आवश्यक व्यवस्थेचा आढावा घेतला.

नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या सार्वजनिक उद्यानांची नियमित देखभाल करण्याबरोबरच परिसर स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्यावर भर देण्याच्या सूचना उद्यान विभागाला देण्यात आल्या.

पाहणीदरम्यान प्रभागातील सुरू असलेल्या तसेच आवश्यक असलेल्या विविध बांधकाम कामांचीही माहिती घेण्यात आली. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निर्देश दिले.

प्रत्यक्ष पाहणी करून समस्या समजून घेतल्यामुळे संबंधित कामांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यास महानगरपालिका प्रशासनाला मदत होणार आहे.

दौऱ्यादरम्यान आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभागातील समस्या केवळ कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

स्वच्छता, कचरा संकलन, उद्यान देखभाल आणि बांधकामाशी संबंधित कामांमध्ये नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विभागांनी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक पातळीवरील समस्या जाणून घेण्यावर भर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने जोग–स्टेडियम प्रभागातील पाहणी दौऱ्यातही विविध बाबींची प्रत्यक्ष माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांसाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

या पाहणी दौऱ्यावेळी सहायक आयुक्त नितीन बोबडे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्‍सेले, उद्यान अधीक्षक बोरकर, ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक कुंदन हडाले, आरोग्य निरीक्षक सुनील चोरपगार, शैलेश डोंगरे तसेच कोणार्क साफसफाई कंत्राटदाराचे प्रतिनिधी धीरज गंगारामानी व आदित्य सुरवाडे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top