बांधकाम विभागातील कामांना गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी शहरात प्रस्तावित करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांच्या अंदाजपत्रकासोबत आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर निर्देश दिले.

प्रस्तावित विकासकामांचे अंदाजपत्रक सादर करताना केवळ कामाचा खर्च अथवा तांत्रिक बाबी नमूद न करता त्या कामाची आवश्यकता, सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष स्थळाची माहिती स्पष्टपणे नमूद करण्यात यावी, असे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.

यामुळे प्रस्तावित कामाची गरज, त्याची उपयुक्तता आणि प्रत्यक्ष परिस्थिती याबाबत प्रशासनाला योग्य निर्णय घेणे सुलभ होणार आहे.

प्रस्तावित करण्यात येणाऱ्या प्रत्येक विकासकामाच्या अंदाजपत्रकात कामाचे नाव आणि काम प्रस्तावित करण्याचे कारण स्पष्टपणे नमूद करण्यात यावे.

संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण केव्हा करण्यात आले, याची स्थळ निरीक्षणाची तारीख व वेळ देखील अंदाजपत्रकासोबत नमूद करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. स्थळ निरीक्षणानंतर प्रस्तावित कामाची सद्यस्थिती दर्शविणारे GPS फोटोग्राफ्स अंदाजपत्रकासोबत जोडण्यात आले आहेत किंवा नाहीत, याची खात्री करावी. प्रत्यक्ष स्थळाची परिस्थिती छायाचित्रांच्या माध्यमातून स्पष्ट होणे आवश्यक असून, यामुळे कामाची आवश्यकता आणि प्रस्तावित स्वरूप याबाबत अधिक पारदर्शकता राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावित विकासकामाचा कामाचा प्रकार तसेच प्रस्तावित कामाचा प्रकार अंदाजपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात यावा.

तसेच ज्या ठिकाणी नवीन काम प्रस्तावित करण्यात येत आहे, त्या ठिकाणी यापूर्वी कधी काम करण्यात आले होते का, याची माहिती घेणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

त्या ठिकाणी यापूर्वी काम झाले असल्यास ते काम अंदाजे कोणत्या वर्षी करण्यात आले होते, याची अंदाजे व ठोबळमानाने वर्षाची नोंद अंदाजपत्रकात करण्यात यावी.

यामुळे एकाच ठिकाणी वारंवार कामे प्रस्तावित होण्याची शक्यता कमी होण्यास मदत होईल तसेच उपलब्ध निधीचा योग्य पद्धतीने वापर करता येईल.

प्रस्तावित विकासकामाच्या अंदाजपत्रकामध्ये कामाशी संबंधित सर्व आवश्यक बाबींचा समावेश करण्यात आला आहे किंवा नाही, याची तपासणी करावी.

कामाच्या स्वरूपानुसार डांबरी रस्ता, काँक्रीट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, मुरूम रस्ता, नाली बांधकाम आदी आवश्यक बाबींचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात यावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

प्रत्येक विकासकामाच्या प्रत्यक्ष गरजेनुसार त्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे, याचा तांत्रिकदृष्ट्या विचार करूनच अंदाजपत्रक तयार करण्यात यावे.

काम सुरू झाल्यानंतर अतिरिक्त बाबींची आवश्यकता निर्माण होणे किंवा कामाच्या स्वरूपात अनावश्यक बदल करण्याची वेळ येऊ नये, यासाठी अंदाजपत्रक तयार करतानाच सर्व बाबींचा सखोल विचार करण्याचे निर्देश देण्यात आले.

महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी काम पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार माहितीचा फलक लावण्यात यावा ज्‍यामध्‍ये दोष दायित्‍व कालावधी, कंत्राटदाराचे नाव, भ्रमणध्‍वनी क्रमांक इत्‍यादी समावेश असावा, असे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.

संबंधित विकासकामाची माहिती नागरिकांना मिळावी, कामाची किंमत, कामाचा कालावधी आणि इतर आवश्यक तपशील पारदर्शकपणे उपलब्ध व्हावा, यासाठी फलकाची तरतूद प्रत्‍येक कामाचे ठिकाणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील विकासकामे दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी काम प्रस्तावित करण्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर योग्य नोंद व दस्तऐवजीकरण करण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

प्रस्तावित विकासकामांची आवश्यकता प्रत्यक्ष स्थळ निरीक्षणाच्या आधारे निश्चित करण्यात यावी. अंदाजपत्रक तयार करताना कामाचा प्रकार, पूर्वी झालेल्या कामाची माहिती, आवश्यक बांधकाम बाबी आणि काम पूर्ण झाल्यानंतरच्या आवश्यक तरतुदी यांचा समावेश असणे गरजेचे आहे.

यामुळे विकासकामांच्या नियोजनात अधिक अचूकता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण होईल, असा प्रशासनाचा उद्देश आहे.

आढावा बैठकीत आयुक्तांनी बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची सद्यस्थितीही जाणून घेतली.

प्रलंबित कामांमागील कारणांचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कामांना प्राधान्य देऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

रस्ते, नाली बांधकामे, काँक्रीट व डांबरी रस्ते, पेव्हिंग ब्लॉक तसेच इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कामांमध्ये गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यावरही आयुक्तांनी भर दिला.

विकासकामाचे अंदाजपत्रक तयार करताना कामाचे नाव, प्रस्तावित करण्याचे कारण, स्थळ निरीक्षणाची तारीख व वेळ, GPS फोटोग्राफ्स, कामाचा प्रकार, प्रस्तावित कामाचा प्रकार, पूर्वी झालेल्या कामाचे अंदाजे वर्ष, अंदाजपत्रकातील समाविष्ट बाबी तसेच काम पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार फलक लावण्याची तरतूद या सर्व बाबींचा समावेश आहे किंवा नाही, याची विभागप्रमुखांनी काटेकोरपणे तपासणी करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

विकासकामे मंजूर करण्यापूर्वी प्रस्तावाची सर्वंकष माहिती प्रशासनास उपलब्ध झाल्यास निर्णय प्रक्रियेत सुसूत्रता येईल आणि सार्वजनिक निधीचा अधिक परिणामकारक वापर करता येईल.

त्यामुळे भविष्यात बांधकाम विभागाकडून सादर करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रस्तावात आवश्यक माहिती पूर्ण स्वरूपात सादर करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिले.

या आढावा बैठकीस बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आयुक्तांच्या निर्देशांमुळे महानगरपालिकेच्या आगामी विकासकामांच्या नियोजनात अधिक शिस्त, पारदर्शकता आणि तांत्रिक अचूकता येण्यास मदत होणार आहे.

या बैठकीस अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता श्रीधर कांबळे, कार्यकारी अभियंता सुहास चव्‍हाण, उपअभियंता, अभियंता, बांधकाम विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top