अमरावती महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा आज, मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
राजापेठ अंडर पास ते केडिया नगर, स्टेट बँक कॉलनी, छाया कॉलनी तसेच एकनाथ पुरम परिसरात आयुक्तांनी भेट देऊन विविध बाबींची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान परिसरातील रस्ते, नाली व्यवस्था, पावसाळी पाण्याचा निचरा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच नागरिकांशी संबंधित विविध प्रश्नांची आयुक्तांनी माहिती घेतली.
परिसरातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती तसेच प्रलंबित कामांबाबत माहिती घेण्यात आली.
पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी प्रभागातील नगरसेवकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व विकासकामांबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या.
प्रभागातील विविध भागांमध्ये नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत, कोणती कामे प्रलंबित आहेत तसेच कोणत्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबत नगरसेवकांकडून माहिती घेण्यात आली.
नगरसेवकांनी प्रभागातील रस्ते, स्वच्छता, विद्युत, नाली व पाणी निचरा व्यवस्था, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित विविध प्रश्न आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या समस्या प्राधान्याने सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
आयुक्तांनी नगरसेवकांनी मांडलेल्या समस्या व सूचनांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा वेळेत आणि सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान पद्धतीने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आयुक्तांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
प्रभागातील उद्यानाचीही आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी पाहणी केली. उद्यानातील स्वच्छता, देखभाल, उपलब्ध सुविधा, परिसराची स्थिती तसेच नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांची त्यांनी माहिती घेतली.
उद्यानाची नियमित स्वच्छता व देखभाल ठेवण्याबरोबरच नागरिकांना चांगले आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उद्यान परिसराचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग व्हावा, यासाठी उपलब्ध सुविधांची योग्य देखभाल करण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
परिसरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याबाबतही आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
प्रभागातील पाहणीदरम्यान ज्या ठिकाणी विकासकामांची आवश्यकता आहे, त्या ठिकाणांची नोंद घेऊन आवश्यक त्या कामांचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या. तसेच सुरू असलेली कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, परिसरात नियमित स्वच्छता ठेवावी आणि नागरिकांच्या तक्रारींकडे तत्काळ लक्ष द्यावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहिल्यास प्रभागातील विकासकामांना गती मिळून नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविता येतील, या दृष्टीने आयुक्तांनी नगरसेवकांशी केलेला संवाद महत्त्वपूर्ण ठरला.
या पाहणी दरम्यान नगरसेविका पद्मजा कौंडण्य, नंदा सावदे, नगरसेवक प्रशांत वानखडे, महेश मुलचंदानी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, शहर अभियंता श्रीधर कांबळे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, शिक्षण अधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, पशुशल्य चिकीत्सक डॉ.तुषार पोहनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप पाटबागे, उपअभियंता दिनेश हंबर्डे, अभियंता लक्ष्मण पावडे, अमरावती शहर समन्वयक श्र्वेता बोके, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ निरीक्षक, मनपा कर्मचारी उपस्थित होते.
