प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी मोहिमेत अमरावती मनपाची कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकविरोधात प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त–II कार्यालयाकडून २४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार झोन क्र. १ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे आणि झोन क्र. १ चे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रभाग क्र. १ शेगाव–रहाटगाव, प्रभाग क्र. ३ नवसारी आणि प्रभाग क्र. ६ विलासनगर–मोरबाग परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली.

मोहिमेदरम्यान विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, विक्री व साठवणूक यांची तपासणी करण्यात आली. तसेच परिसरातील स्वच्छता आणि दोन डस्टबिनची उपलब्धता याबाबतही पाहणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने शेख कोसिफ यांच्यावर ₹५,०००, पूर्ती ट्रेडर्सवर ₹५,००० आणि सर्वज्ञ प्रोविजनवर ₹५,००० असा दंड आकारण्यात आला. या कारवाईतून एकूण ₹१५,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू ढिक्याव, प्लास्टिक स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी तसेच स्वास्थ्य निरीक्षक अनिकेत महल्ले, इमरान खान, शाहू जवंजाळ, एम. सैय्यद, निखिल खंगाळे आणि रोहित हडाले यांनी सहभाग घेतला.

महानगरपालिकेच्या वतीने प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर यापुढेही दंडात्मक कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top