अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक १ अंतर्गत रामपुरी कॅम्प ते विलास नगर रोड परिसरात सोमवारी डस्टबिन व प्लास्टिकमुक्त परिसर मोहीम राबविण्यात आली.
महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे आणि झोन क्रमांक १ चे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आयुक्त व वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेदरम्यान प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, विक्री व साठवणूक तसेच परिसरातील स्वच्छता आणि दुकानदारांकडे दोन डस्टबिनची उपलब्धता व वापर याबाबत तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने उत्तम राठोड यांच्यावर ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
तसेच दोन डस्टबिनचा वापर आढळून न आल्याने कृष्णा नुक्कड कचोरी, मिरानी किराणा, नारायण मिरानी, संतोष मिरानी आणि महालक्ष्मी डेअरी यांच्यावर प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
या मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू ढिक्याव, स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी, इमरान खान, एम. सैय्यद, निखिल खंगाळे आणि मनीष नकवाल यांनी सहभाग घेतला.
महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याबरोबरच स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.
