स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती महानगरपालिकेची राष्ट्रीय भरारी; देशात तृतीय क्रमांकाचा मान

शहरातील वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने राबविलेल्या विविध उपाययोजनांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत ३ ते १० लाख लोकसंख्या गटात अमरावती शहराने देशात तृतीय क्रमांक पटकावला असून, महानगरपालिकेला २५ लाख रुपयांचे राष्ट्रीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.

नवी दिल्ली येथील इंदिरा पर्यावरण भवनातील गंगा सभागृहात आयोजित राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार सोहळ्यात अमरावती महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय हरित अधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाचे अध्यक्ष राजेश वर्मा, पर्यावरण सचिव तन्मय कुमार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमनदीप गर्ग यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांनी मान्यवरांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.

अमरावती महानगरपालिकेने शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध स्तरांवर सातत्यपूर्ण उपाययोजना राबविल्या आहेत.

रस्त्यांची यांत्रिक स्वच्छता, धूळ नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, वृक्षारोपण व हरित क्षेत्रवाढ, कचरा व्यवस्थापन तसेच बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण यांसारख्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.

शहरातील वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांची ओळख करून त्यावर लक्ष केंद्रित करत महानगरपालिकेने विविध विभागांच्या समन्वयातून उपाययोजनांची अंमलबजावणी केली.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या कामांचे नियमित निरीक्षण, नोंदणी आणि मूल्यांकन करण्यात आले.

‘स्वच्छ वायू सर्वेक्षण’ अंतर्गत शहरांच्या कामगिरीचे मूल्यमापन विविध निकषांच्या आधारे करण्यात येते.

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना, त्यांची अंमलबजावणी आणि हवेच्या गुणवत्तेतील सुधारणा यामध्ये अमरावती महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली.

देशातील ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये तृतीय क्रमांक मिळविणे ही अमरावती महानगरपालिकेच्या सातत्यपूर्ण पर्यावरणीय प्रयत्नांची राष्ट्रीय पातळीवरील पावती आहे.

पुरस्कारातून प्राप्त होणारी २५ लाख रुपयांची रक्कम शहरातील वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या पुढील उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे.

अमरावती शहराला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान शहरातील नागरिक, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत सर्व घटकांच्या सामूहिक प्रयत्नांना समर्पित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top