अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिनाचा भव्य कार्यक्रम

अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे.

महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा गौरव या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती ॲड. प्रीतीताई रेवणे तसेच शिक्षण समितीतील इतर सन्माननीय सदस्य यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. मा. आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, उपस्थिती व पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, शैक्षणिक प्रगतीला तसेच शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र लॉन, बडनेरा रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापकांचा सत्कार, आदर्श शाळा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे.

तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय प्राविण्य मिळवून देणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

त्यामुळे महानगरपालिका शिक्षण विभागात नव्या शिक्षकांच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर पाहुण्यांच्या आगमनाने होऊन फोटो पूजन व दीप प्रज्वलन, स्वागत गीत, पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक करण्यात येईल.

त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापकांचा सत्कार, आदर्श शाळा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्र वितरण, गुणवंत शाळांचा व शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात महानगरपालिका शाळांमधील दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत व अध्यक्षीय भाषण होईल.

शेवटी आभार प्रदर्शनानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षकांच्या अथक प्रयत्नातून राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रम हे महानगरपालिका शिक्षण विभागाची सकारात्मक वाटचाल अधोरेखित करणारे आहेत.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण,उत्तम शैक्षणिक वातावरण आणि विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभाग मा शिक्षण सभापती ऍड प्रीतीताई रेवणे हया सातत्याने प्रयत्नशील आहेत.

त्यांचे नेतृत्वामध्ये शिक्षण समिती मनपा शाळांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top