अमरावतीत ‘सात्त्विक गणपती’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सात्त्विक गणपती’ उपक्रमांतर्गत मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सांस्कृतिक भवन, अमरावती येथे उत्साहात संपन्न झाली.

‘सात्त्विक गणपती’च्या कु. मयुरी दिपक खताडे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यशाळेला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती महानगरपालिका तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे सहकार्य लाभले.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या सहमती व मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेत नागरिकांना मातीपासून स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व, मातीच्या मूर्तींचे पर्यावरणीय फायदे तसेच जल आणि पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता याबाबत जनजागृती करण्यात आली.

विशेष म्हणजे कार्यशाळा नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली होती. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आले.

कु. मयुरी दिपक खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष शिकविण्यात आली. त्यामुळे सहभागी नागरिकांना स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा अनोखा अनुभव मिळाला.

परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर समन्वय साधत गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.

पर्यावरणाचे रक्षण करत पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘सात्त्विक गणपती’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला या उपक्रमामुळे निश्चितच बळ मिळाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top