मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा इंग्रजीबाबत आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज

अमरावती महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्य व गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे मनपाचे प्राथमिक कर्तव्य आहे.

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत सहज व आत्मविश्वासपूर्वक संभाषण करता यावे आणि भविष्यात इंग्रजी भाषेचा कोणताही अडथळा त्यांच्या प्रगतीत येऊ नये, या दूरदृष्टीतून महानगरपालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये ‘इंग्लिश क्लब’ ची स्थापना केली आहे.

खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच मनपा शाळेचे विद्यार्थीही अस्खलितपणे इंग्रजी बोलू शकावे आणि त्यांच्या मनातील इंग्रजी भाषेची भीती कायमची दूर व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

यासाठी शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार एक स्वतंत्र आणि रंजक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक शाळेतील एका उपक्रमशील शिक्षकाची ‘ब्रँड ॲम्बेसिडर’ म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, वर्षभर विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, संवाद सत्रे आणि स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर, नुकतीच महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा, महादेवखोरी येथे सर्व ब्रँड ॲम्बेसिडर शिक्षकांची एक महत्त्वपूर्ण नियोजन सभा अमरावती महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पार पडली.

यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना वर्षभराचे सविस्तर शैक्षणिक नियोजन समजावून सांगितले तसेच वर्षभरात राबवायच्या विविध उपक्रम व स्पर्धांच्या आराखड्यावर सखोल चर्चा केली.

सदर बैठकीला शाळा निरीक्षक श्री योगेश पखाले, कु. ज्योती बनसोड, उपक्रम प्रभारी श्री चेतन आर्वीकर, श्री रोहन वासनिक आणि मुख्याध्यापक श्री प्रशांत नालसे यांच्यासह मनपा शाळांचे सर्व ब्रँड ॲम्बेसिडर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top