शहरातील विविध भागांत कृत्रिम विसर्जन टँकची सुविधा; प्रथमेश तलाव व छत्री तलाव येथे कृत्रिम तलावाची सुविधा

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये तसेच विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, सुव्यवस्थित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावी, यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

२५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपाने शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था केली आहे. याशिवाय प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे कृत्रिम तलावाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध जलस्रोतांकडे जात असतात. त्यामुळे गर्दी, वाहतूक कोंडी तसेच जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते.

ही बाब लक्षात घेऊन अमरावती महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी त्यांच्या जवळच्या परिसरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करता यावे, यासाठी विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन टँक उपलब्ध करून दिले आहेत.

महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन टँकमध्ये अभियंता भवन, शेगाव नाका, शासकीय फार्मसी महाविद्यालयाजवळील कठोरा नाका, आराधना बिल्डिंग कॉर्नर, रिंग रोड, वेलकम पॉईंट चौक, सहकारनगर ग्राउंड, पेट्रोल पंपाजवळील कॉटन मार्केट रोड, शिवाजी कमर्शियल मार्केट, रविनगर चौक, नेहरू मैदान परिसर, मोतीनगर बगीचा, मोतीबाग, प्रशांतनगर बगीचा, मालटेकडी मागील गेटजवळ, वडाळी मनपा उद्यान, विद्यापीठ चौक पुलाजवळ, प्रथमेश तलाव, साईनगर बँक ऑफ बडोदाजवळ, तापडिया मॉलमागील श्री महाबली हनुमान मंदिर परिसर, जुना सातुर्णा, साईनगर, बडनेरा झिरी तलाव, गोपालनगर जिमजवळ, सिपना कॉलेज रोड, गोस्वामी कॉलनी शिवमंदिराजवळ, बडनेरा भगतसिंग चौक, बारीपुरा, महाजनपुरा, हनुमाननगर, छत्रपती बगीचाजवळ, रविनगर, पुसदकर मैदान बुधवारा, बालाजीनगर, पुष्पक कॉलनी, नवग्रह शनी मंदिराजवळ, मनपाचे ओपन स्पेस कंपाऊंड, भातकुली रोडवरील ड्रीम पार्क अपार्टमेंटसमोर तसेच पार्वतीनगर क्रमांक १ येथील संकटमोचन हनुमान मंदिरासमोर आदी ठिकाणांचा समावेश आहे.

या सर्व ठिकाणी नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराजवळील उपलब्ध कृत्रिम विसर्जन टँकचा वापर करून मनपाच्या विसर्जन व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे विशेष स्वरूपाची कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी अमरावती महानगरपालिकेने प्रत्येक विसर्जनस्थळी नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधित ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था, नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन, स्वच्छता तसेच इतर बाबींची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

विसर्जनाच्या दिवशी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने विविध ठिकाणी आवश्यक नियोजन केले आहे. कृत्रिम विसर्जन टँकच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरातच विसर्जनाची सुविधा उपलब्ध झाल्याने दूरवर जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशभक्तांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याऐवजी आपल्या घराजवळ उपलब्ध असलेल्या कृत्रिम विसर्जन टँकचा वापर करावा.

विसर्जनस्थळी मनपा कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. तसेच विसर्जनादरम्यान परिसरात कचरा न टाकता स्वच्छता राखावी, असे आवाहनही महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्या घरातील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नेमून दिलेल्या जवळच्या कृत्रिम विसर्जन टँकमध्येच करावे.

यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच शहरातील स्वच्छता मोहिमेलाही हातभार लागेल असे आवाहन अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

गणेश विसर्जनाचा सोहळा श्रद्धा, शिस्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नागरिकांनी मनपाच्या व्यवस्थेचा लाभ घ्यावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top